नाशिक: बुधवार (दि.7) रोजी मालेगाव येथील खड्डाजिन रोडलगत असलेल्या मजदूर कॅन्टीन येथे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेताना पोलीस नाईक तानाजी मोहन कापसे याला रंगेहात पकडले असुन याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली होती.
मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्यात तानाजी कापसे हे पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्ररादार यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि कारवाईत मदत करण्यासाठी कापसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात लेखी तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता तानाजी कापसे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी मालेगाव सिव्हिल हॉस्पिटल व खड्डा जीन रोड लगतच्या मजदूर कॅन्टीन जवळ सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच घेताना पथकाने कापसे याला रंगेहात पकडले. तानाजी कापसे यांच्याविरुद्ध आज (गुरुवार) मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.