बीड, दि, 8 (जि. मा. का.) : बीड जिल्ह्यात एकूण 17 पशुंचे प्रमुख बाजार आहेत या पैकी गेवराई तालुक्यातील उमापूर, हिरापूर, जातेगाव आणि तलवाडा, वडवणी तालुक्यातील वडवणी व कुप्पा, बीड तालुक्यातील नेकनुर, केज तालुक्यातील साळेगाव, विडा, माजलगाव तालुक्यातील पात्रुड, राजेगाव, धारुर तालुक्यतील अंबेवडगाव, आडस हे प्रमुख पशुंचे बाजार असून लम्पी स्किन आजाराचा फैलाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पशुंचे सर्व बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी केले आहे.
लम्पी स्किन डिसिज हा आजार बीड जिल्ह्यातील धसवाडी ता. अंबाजोगाई या गावामध्ये आढळून आला आहे. दि. 5 स्पटेंबर 2022 रोजी शिरुर तालुक्यातील घोगस पारगाव आणि आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली, इमानगांव या गावांमधील लम्पी सदृश्य पशुरुग्णांचे रोगाचे नमूने निदानासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. लम्पी स्किन डिसीजचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बाधित जनावरांची हालचाल पूर्णपणे बंद करण्याबात सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनेनुसार अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा आणि शिरुर या तालुक्यतील जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.