सेलू येथील एक अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी संतप्त सेलूकरांनी गुरुवार ८ सप्टेंबर रोजी सेलू तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
गेल्या दोन दिवसापासून सेलू शहरासह परिसरात या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले . संतप्त नागरिकांनी संबंधित आरोपींना अटक करा या मागणीसाठी पोलीस प्रशासनावर मोठा दवाब आणला होता.त्या पाठोपाठ विविध पक्ष, संघटना,संस्थांनी या घटनेतील आरोपींविरुद्ध पोक्सो कायदाअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या आरोपीविरुद्ध जलद गतीच्या न्यायालयात खटले चालावेत, न्यायालयात नामवंत वकील उज्वल निकम यांची खटला चालविण्याकरता नियुक्ती करावी अशी मागणी विविध निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्या पाठोपाठ गुरुवारी या सर्वपक्षीय पक्ष,संघटना, संस्था व व्यापारी संघटना यांच्या वतीने सेलू तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे संतप्त व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला. या संतप्त व्यापारी, नागरिकांनी गांधी चौकातून मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढला मोर्चेकर्यांनी संबंधित आरोपी फाशीची शिक्षा द्या, आरोपींविरू ध्द पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करा, महिलांना संरक्षण मिळालेच पाहिजे अशी ही मागणी केली.
या मोर्चात अग्रभागी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. संतप्त मोर्चेकरांनी तालुका महसूल प्रशासनास निवेदन सादर करून सेलू तील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दरम्यान महसूल व पोलीस प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत कठोरपणे हाताळले जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे.