पाथरी:-भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करत असतांना पाथरी तालुक्यातील ग्रामिण भागात वाघाळा येथे अस्तित्वात असलेली सर्वात जुनी जिल्हापरिषदेची इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतची शाळा मात्र या शाळेत सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात असुन विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी तर सोडाच विद्यार्थ्यांन साठी स्वच्छतागृह ही उपलब्ध नसल्याने ज्ञानार्जना साठी येणा-या विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे. या विषयी माकपच्या वतीने शेख अनिस यांनी गटविकास अधिकारी यांना बुधवार ७ सप्टेबर रोजी निवेदन देऊन विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्या सह स्वच्छता गृहाची त्वरीत उपलब्धता करून द्यावी अन्यथा पाचशे विद्यार्थ्यां सह गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
माकपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघाळा ता. पाथरी जि. परभणी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. या शाळेत गावातील तसेच या गावाच्या जवळील मुदगल, वंजारवाडी व फुलारवाडी या गावातील विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येथे येतात. या तिन्ही गावातील मुले-मुली मिळून जवळपास ५०० (पाचशे ) विद्यार्थी संख्या होते. परंतु बाहेर गावाहून ज्ञानर्जना साठी येथे येणा-या विद्यार्थ्यांचे खुप हाल होतात.
त्यांना साधे पिण्याचे शुध्द पाणी देखील मिळत नाही. विशेष म्हणजे या शाळेमध्ये दोन वॉटर फिल्टर उपलब्ध आहेत. परंतु काही कारणास्तव ते मागील बऱ्याच काळापासून बंद पडले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही पुढाकार घेण्यासाठी तयार नाही. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांना वीस रुपये देऊन पाण्याची बॉटल विकत घेऊन विद्यार्थ्यांना तहान भागवावी लागत आहे.
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मजूर, शेतमजूर व शेतकरी यांचे मुलं असतात त्यांना पाणी पिण्यासाठी दरवेळी पाणी बॉटल विकत घेणे न परवडणारी बाब आहे. गावातील स्थानिक विद्यार्थी शाळेच्या मधल्या सुट्टीत आप - आपल्या घरी जाऊन पाणी पिऊन तसेच स्वच्छतागृहाचा वापर करून येतात. परंतु बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची शाळेत स्वच्छतागृह नसल्यामुळे मोठी अडचण व कुचंबना होत आहे. त्यांना नैसर्गिक विधी करण्यासाठी उघड्यावरच किंवा झाडा झुडुपांचा आडोसा पाहूनच जावे लागत आहे.
एकीकडे देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव राबवत आहे आणि दुसरीकडे मात्र या शालेय विद्यार्थ्यांना जे की उद्याचे भारताचे भविष्य ज्यांच्या हाती आहे ले भारताचे भविष्य आहेत त्यांनाच किमान मुलभूत सोयी-सुविधा देखील मिळत नाहीत. ही खुप मोठी शोकांतिका आहे.
या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करण्यात येते की, मौजे वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्यांना पिण्याचे शुध्द पाण्याची व स्वच्छतागृहाची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शाळेतील सर्वच्या सर्व पाचशे विद्यार्थ्यां सह आपल्या गटशिक्षणाधिकारी, गट साधन केंद्र पाथरी. येथे ताला ठोको आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे शेख अनिस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.