बीड (प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी मंगळवारी दि.०६ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, लिंबेगाव, खजेवाडी परिसरात त्यांनी महसूल, कृषी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींसमक्ष पिकांची ऑन फिल्ड पाहणी केली.

पीक परिस्थितीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या की ‘जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांना तिबार पेरणीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणे क्रमप्राप्त आहे, हा त्यांचा अधिकार आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भरपाईचे निकष पूर्ण होऊन मदत मिळेल याची दक्षता घ्या.ज्या महसूल मंडळात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे त्या मंडळात सरसकट मदत मिळावी याकरिता प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या.

गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीची विशेष बाब म्हणून भरपाई द्या

गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने विशेष बाब म्हणून भरपाई देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, गोगलगायींमुळे झालेल्या हानीला विम्याचे ही संरक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, शेतकऱ्यांना उभारी आणि दिलासा द्यायचा असेल तर विशेष बाब म्हणून मदत करणे आवश्यक असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या, त्यांच्या या सूचनेला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यादृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांबाबत निष्काळजी खपवून घेणार नाही ; विमा कंपन्यांना ठणकावले

विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.शेतकऱ्यांना हे प्रतिनिधी उडवाउडवीचा प्रतिसाद देत आहेत,हे अक्षम्य आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला एकही टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसल्याचे ही निदर्शनास आले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन दिवसांचा वेळ देणाऱ्या कंपन्यांनी अगोदर शेतकऱ्यांना मदत आणि तक्रारीसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे माध्यम द्यावे. शेतकऱ्यांबाबत निष्काळजीपणा करणार असाल तर खपवून घेतला जाणार नाही अशा तीव्र शब्दात खा.प्रितमताई मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावले, तसेच प्रशासनाला देखील यासंदर्भात सूचना दिल्या.