परभणी,दि.07(प्रतिनिधी) : स्टेशन रस्त्यावरील बचत भवनाजवळील नवीन नाट्यगृहाच्या पूर्णत्वाकरीता आणखीन 11 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

                 आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील तसेच नवनियुक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी बुधवारी (दि.07) नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामांना भेट दिली. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सुनील देशमुख, माजी नगरसेवक सचिन अंबिलवादे, नगर अभियंता वसीम पठाण, उपअभियंता पवन देशमुख, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, श्रीकांत कुर्‍हा व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 1 हजार आसन क्षमतेच्या या नाट्यगृहात वातानूकुतील यंत्रणांसह अन्य अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे मनपाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या नाट्यगृहाकरीता आणखीन निधी आवश्यक आहे. जवळपास 11 कोटींची तरतूद झाली तर या नाट्यगृहाचे काम सर्वार्थाने पूर्ण होवू शकेल, असे स्पष्ट केले. यावेळी आमदार वरपुडकर व आमदार पाटील यांनी नवीन नाट्यगृहाच्या पूर्णत्वाकरीता लागणारा 11 कोटी रुपयांचा निधी मिळवून देवू, अशी ग्वाही दिली.

               दरम्यान, आयुक्त सांडभोर यांनी सध्याच्या कामाची स्थिती आणि अपूर्ण कामे तसेच उपाययोजनांसंदर्भात अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. या नाट्यगृहाचे काम पूर्ण व्हावे, या दृष्टीने आपण सर्वार्थाने प्रयत्न करु, असे आयुक्त सांडभोर यांनी नमूद केले. शासनाकडून 11 कोटी रुपयांच्या निधीसाठीचा तातडीने प्रस्ताव सादर करावा व नवीन नाट्यगृहात सौरउर्जा यंत्रणा बसविण्याकरीताही प्रस्ताव सादर करा, असे आयुक्त सांडभोर यांनी म्हटले.