सोलापूर - सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून सोलापूर शहरात पाणी टँकर पुरवठा केल्याच बनावट खेप दाखवून महानगरपालिके कडून अधिक रकमा घेतली असल्याने प्रकार समोर आला आहे.याबाबत महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अविनाश वाघमारे(महानगरपालिका झोन अधिकारी) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तत्कालीन अधिकारी ए.व्ही भालेराव,तत्कालीन ज्युनिअर इंजिनिअर ए.पी सावस्कर,तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक कुमार अंबादास नंदा,निवृत्त कनिष्ठ लिपिक चंद्रकांत सिद्राम श्रीमंगले,शफी शेख,सोमनाथ शिवानंद साखरे, अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.7 सप्टेंबर रोजी दुपारी जेलरोड पोलीस ठाणे येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सक्षम हजर राहून फिर्याद दिली आहे.
2016 ते 2018 या वर्षांत पाणी टंचाई भागात टँकरने पाणी पुरवठा केला होता-
सोलापूर शहरात 2016 ते 2018 दरम्यान भीषण पाणी टंचाई होती.या काळात सोलापूर महानगरपालिकेने झोन प्रमाणे टँकरने पाणी पुरवठा सुरू केला होता.ज्या भागात नळांना पाणी येत नाही ,किंवा पाण्याची टंचाई आहे अशा भागात टँकर ने पाणी पुरवठा केला जात होता.हा पाणी पुरवठा एका खाजगी वाटर सप्लायर कडून केला जात होता.प्रत्येक खेप प्रमाणे महानगरपालिकेला बिल सादर केले जात होते.सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी ए.व्ही भालेराव, तत्कालीन ज्युनिअर इंजिनिअर ए.पी सावस्कर, तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक कुमार अंबादास नंदा, निवृत्त कनिष्ठ लिपिक चंद्रकांत सिद्राम श्रीमंगले पाणी पुरवठ्याचे कामकाज पाहत होते.
खाजगी वाटर सप्लायरने अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत घेतले अधिकचे बिल-
सोलापूर शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी एका खाजगी वाटर सप्लायरला ठेका देण्यात आला होता.त्याचे नाव सागर वाटर सप्लायर आहे.शफी शेख,सोमनाथ शिवानंद साखरे हे पाणी पुरवठा करणारे खाजगी इसम आहेत. यांनी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करत पाण्याच्या टँकरच्या कमी खेपा केल्या मात्र सोलापूर महानगरपालिकेला बिल काढत असताना अधिकच्या खेपा दाखवल्या अशी नोंद जेलरोड पोलीस ठाणे येथे झाली आहे.वार्षिक 25 लाखांपर्यंत येणार बिल 96 लाख पर्यंत गेला.ही बाब सोलापूर महानगरपालिका सदस्यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला. पाणी टँकरचे वार्षिक 25 लाखां पर्यंत येणारे बिल 96 लाखांपर्यंत कसे गेले असे अनेक प्रश्न सभागृहात नगरसेवकांनी उपस्थित केले होते.यावर महानगरपालिका आयुक्त यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.आदेश दिल्या नंतर पुन्हा पाणी टँकरचे बिल 25 लाखांपर्यंत येऊन थांबले.यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला त्यांनी ताबडतोब चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
पाणी टँकरचा घोटाळा कोट्यवधी रुपयां पर्यंत जाण्याची शक्यता-
महानगरपालिका झोन अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींनी टँकर क्रमांक एम एक्ससी 5656 या पाणी टँकर द्वारे 1 एप्रिल 2017 ते 24 सप्टेंबर 2017 पर्यंत 189 खेपा अधिक दाखवून बिल लाटली आहेत.तर टँकर क्रमांक एमएच 11 -5042 या पाणी टँकर द्वारे 1 एप्रिल 2017 ते 31 जुलै 2017 दरम्यान 95 खेपा अधिक दाखवून महानगरपालिकेकडून बनावट बिल सादर करून रक्कम मंजूर करून घेतली आहे.सद्यस्थितीत तर दाखल झालेल्या गुन्ह्या नुसार सागर वाटर सप्लायर आणि महानगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 284 अधिकच्या खेपा दाखवल्याची नोंद झाली आहे.यामधून संशयीत आरोपींनी 1 लाख 42 हजार अपहार झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून हा आकडा कोट्यवधी रुपयांचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रईसा शेख करत आहेत.