पशुधनामध्ये अतिशय गतिमानतेने प्रसार होणारा, विषाणूजन्य, देवी कॅम्पिप्रोक्स प्रवर्गातील लंपी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. २० व्या पशुगणनेनुसार जिल्हयात २,९९,८६१ एवढ्या गायींची संख्या आहे तर ९८, ४९५ एवढ्या म्हशींची संख्या आहे. म्हशीपेक्षा गायी आणि बैल यांच्यामध्ये लंपी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव लातूर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे सारख्या जिल्हयात वाढताना दिसत आहे. शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजाराची अशी आहेत लक्षणे अंगावर १५ ते २० मी मी व्यासाच्या गाठी येतात, सुरुवातीस भरपूर ताप येतो, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येतो,चारा खाणे - पाणी पिणे बंद होते,दुग्ध उत्पादन कमी होते.काही जनावरांत पायावर सूज येते. शेतकऱ्यांनी आपल्या पशूंची अशी काळजी घ्यावी आपल्या गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करावी, बाधित जनावरे तात्काळ वेगळी करावीत, साथीचा प्रादुर्भाव असे पर्यंत दुसऱ्या पशूंची खरेदी थांबवावी, गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचीड होणार नाही याची दक्षता घ्यावी. पशुसंवर्धन विभागाची जनजागृती मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लंपी त्वचा आजारा विषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिम सुरु असून पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी लंपी आजारा बाबत शेतकऱ्यांचे समज - गैरसमज दूर करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठलीही भीती न बाळगता आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच पशूंमध्ये कुठल्याही बदलाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. -शिवानंद टाकसाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी