परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सौदागर आबाजी कांदे यांना 5 सप्टेंबर रोजी बीड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.
सौदागर कांदे हे नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून परळी तालुक्यात परिचित आहेत. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय कार्याची बीड जिल्हा परिषदेने दखल घेऊन बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 साठी त्यांची निवड केली होती. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते सौदागर कांदे यांचा सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सारुक ,वरिष्ठ अधिकारी जटाळे, कुलकर्णी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.सौदागर कांदे यांना यापूर्वी विविध सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, वर्तमानपत्रांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. त्यांना यापूर्वी आठ पुरस्कार मिळालेले आहेत. बीड जिल्हा परिषदेचा मिळालेला हा नववा पुरस्कार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला बीड जिल्ह्यातील शिक्षक वर्ग, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.