नवरा जेलमध्ये, बायको विकते गांजा;एनडीपीएसने साडेपाच किलो गांजासह तस्कर पत्नीस पकडले..
औरंगाबाद(विजय चिडे)औरंगाबाद गांजा विक्री करताना पतीला पोलिसांनी पकडले. गेल्या काही वर्षांपासून तो हसूल कारागृहात आहे. त्यामुळे पतीचा गांजा विक्री धंदा पत्नीने सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. 'एनडीपीएस' पथकाने महिलेच्या घरात छापा मारून ५ किलो ५२१ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात 'एनडीपीएस' कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. दरम्यान, आरोपी महिलेस न्यायालयात हजर केले असता, ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
रंजना पांडे (रा. रामेश्वरनगर, मयूर पार्क) असे आरोपी महिलेचे नाव आहे. एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकास रंजनाच्या घरातून गांजाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक घुगे, सहायक फौजदार नसीम खान अंमलदार महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे, आरती कुसळे आणि राजेंद्र चौधरी यांच्या पथकाने छापा मारला. तिच्या ताब्यातून ५ किलो ग्रॅम गांजा जप्त केला. हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या महिलेच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातही एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.