पूर्णा 

कोणताही शिक्षक हा सेवा म्हणून विद्यार्थ्यांना घडवित असतो. मुलांचा सार्वगिंण विकास व्हावा, यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करीत असतात. परंतु, शिक्षकांनो, तुम्ही अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना मेरिट मध्ये आणाल. मात्र, मुलांना केवळ मेरिटच्या यादीपुरते संकुचित न ठेवता अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन चांगले नागरिक सुध्दा घडवा, अशी अपेक्षा गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल मध्ये आयोजित सामन्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौदाळे, सचिव दशरथ साखरे, शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.भुकरे सर, एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे रफिक शेख, पोलीस पाटील गणपत साखरे, मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम, पूर्णा प्रभारी सुभाष देसाई होते.

पुढे बोलताना आ.डॉ. गुट्टे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांच्या बौध्दिक कौशल्यास चालना देण्याचं काम स्वदेश फाऊंडेशन करीत आहे. असे शैक्षणिक उपक्रम नेहमी राबविले गेले पाहिजेत. गेल्या सहा वर्षापासून सातत्याने असा उपक्रम घेण्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती लागते. ती स्वदेश फाऊंडेशनकडे आहे. म्हणूनचं त्यांची योग्य वाटचाल सुरु आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचेही धडे विद्यार्थ्यांना द्या. शालेय पुस्तकातील धडे, कविता आणि गणितांबरोबरच आयुष्याचीही गणिते मांडायला शिकवा व ती सोडवण्या इतपत त्याला सक्षम बनवा. कारण, तुम्ही चिखल मातीच्या गोळ्याला आकार देणारे क्रांतिकारी आहात. 

यावेळी कैलास काळे, सुदाम वाघमारे, नवनाथ भुसारे, शिवाजी आवरगंड, मारोती मोहिते, पशुपती शिराळे, उध्दव शिंदे, उत्तम अंबोरे, दत्तराव पौळ, शरद जोगदंड, ईस्माईल शेख, बापूराव डुकरे, नरहरी साखरे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.