बीड - विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. पडलेल्या विद्युत पोलच्या तारेला चिटकून दोन म्हशी दगावल्या आहेत. ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना बीडच्या शिदोड गावात उघडकीस आली आहे.बीड पासून जवळच असलेल्या शिदोड येथील बालाजी मुकुंद कुंभारकर, या शेतकऱ्याने म्हशी चारण्यासाठी शेतामध्ये सोडून दिल्या होत्या. मात्र शेतात वादळामुळे विद्युत पोल कोसळलेले कुणाच्याही लक्षात आले नाहीत. तीन म्हशी चरता-चरता विद्युत पोल जवळ गेल्याने, विजेच्या तारेला चिकटल्या.

यावेळू त्यातील दोन म्हशी जागेवर मृत पावल्या असून 1 म्हैस गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर यामुळं शेतकरी कुंभारकर याचं जवळपास 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी वीज वितरण कंपनीच्या लाईनमनला संपर्क साधण्याचा फोन केला असता त्याने साधा फोनही उचलण्याची मानसिकता दाखवली नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांची साधी दखलही घेतली जात नाही. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.