केंद्रीय बियाणे अधिनियम, 1966 नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला असून याबाबत दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली आहे. यात विद्यापीठ विकसित करडई पिकांच्या पीबीएनएस 184, देशी कापसाच्या पीए 837 तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणांचा समावेश आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. देशाच्या राजपत्रात वनामकृविच्या तीन पीक वाणांचा समावेश केल्याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी सर्व संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या तीन वाणातील करडई पिकांच्या पीबीएनएस 184 वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, तेलगंणा आदी राज्याकरिता तर देशी कापसाच्या पीए 837 या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात विक्रीसाठी प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली. तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात प्रसारणाची मान्यता प्राप्त झाली. यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते असून आणि या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. या राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ 4065 अ हा आहे.