सोनपेठ तालुक्यात मागील ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसात मोठा खंड पडल्यामुळे सर्वच पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पेरणी वेळेवर व योग्य प्रमाणात झाल्यामुळे बहारदार पिके आली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. कापूस सोयाबीन व तूर या पिकांनी ऊन धरण्यास सुरुवात केली आहे. तर सोयाबीनचे पीक हे पूर्णपणे हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सर्वच गावात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमानुसार हंगामात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच बरोबर या संबंधाने पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग, पीकविमा कंपनी व तालुका प्रशासन यांनी संयुक्तपणे मार्गदर्शन करावे. पावसाचा खंड ही नैसर्गिक आपत्ती असून पीकविमा अँप मध्ये हे कारण नमूद करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना वयक्तिक तक्रार करता येत नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ प्रतिकूल हंगाम परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम पीकविमा मिळवून द्यावा व त्यासाठी योग्य ते नियोजन करावे असे निवेदन शेतकरी संघटनेने तालुका प्रशासनाला दिले आहे. या निवेदनावर सुधीर बिंदू, गणेश जोगदंड पाटील, विश्वाभर गोरवे, कृष्णा पिंगळे,गणेश पतंगे, अनिल भोसले, सोमनाथ नागुरे, उमेश कदम, नारायण आळसे,विष्णु गव्हाडे,भगवान मोहिते, विठ्ठल खरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.