चिपळूण : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ येथील कनिष्ठ सहायक लिपिक दुष्यंत शहाजी तिरमारे याने पगार बिलातून १ कोटी ६३ लाख ६९ हजार ६२७ रूपयाचा शासनाला गंडा घातला. त्याच्याकडून सन २०२० पासून पगार बिलात खोटी माहिती देऊन पैसे हडपण्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप पसारच असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा कसून तपास सुरू ठेवला असून तिरमारेची काही बँक खाती गोठवली आहेत.

कनिष्ठ सहाय्यक लिपिक दुष्यंत तिरमारे यांनी चतुराईने पगार बिलातून शासनाला पावणे दोन कोटीचा गंडा घातला आहे. त्याच्याकडून गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. महिन्याकाठी सरासरी १० लाखाची रक्कम तो पगार बिलातून काढत होता. नियमित पगारापोटीची रक्कम अदा होत असतानाही ती कमी पडल्याने चौकशीला सुरुवात झाली आणि तिरमारेचे कारनामे उघड झाले. तिरमारेने अपहार केल्याने येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती सदानंद जाधव यांनी सावर्डे पोलीस स्थानकात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही. तिरमारे याने पगार बिलातून हडप केलेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतली होती. जमा झालेली रक्कमेची त्या-त्या महिन्यात विल्हेवाट लावली. लाखोंच्या रक्कमा काहींना धनादेशाद्ववारे दिल्या. तर अनेकदा २ ते ५ लाखापर्यंतची रक्कम स्वतःच काढलेली आहे. जमविलेल्या ही काळी माया त्याने कुठे इन्व्हेस्ट केली याचा शोध सुरू आहे. याबाबत सावर्डे पोलीस निरीक्षकांशी संवाद साधला असता या प्रकरणी तपास सुरू असून तिरमारेबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.