सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी 9 सप्टेंबर गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना पत्र देऊन विविध सूचना करताना 3 फुटी पेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्याची सूचना केली.
सोलापूर शहरातील सर्वच मध्यवर्ती सार्वजनिक महामंडळांच्या अंतर्गत गणेशोत्सव साजरा करणारी गणेश मंडळे यांच्या 3 फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन शहराबाहेरील खाणीमध्ये करण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे नियोजन असल्याचे समजते.
याबाबत शहरातील प्रत्येक विभागात असलेले विसर्जन कुंड, तलाव याठिकाणीच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेश उत्सव मंडळाच्या 3 फुटापेक्षा मोठ्या गणेश मुर्ती एकत्रित जमा करून घ्याव्यात व दरवर्षीचा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदात, खेळीमेळीने, विनाकलह संपन्न करावा. विसर्जनानंतर गणेश उत्सव मंडळाकडून जमा करून घेतलेल्या 3 फुटापेक्षा मोठ्या मुर्तीचे पावित्र्य जपत सोलापूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ठिकाणी विधीवत गणेश मुर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात यावे.
तसेच विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्यकुंड, आवश्यक सोयी-सुविधा, जीवरक्षक यांची परीपूर्ण व्यवस्था करावी व घाईगर्दीत कुणाही निरपराध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यु होणार नाही याची काळजी घ्यावी.
गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुक मार्गावर पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन यासह तातडीची मदत यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी व कोणतीही दुर्घटना घडणार नाही यादृष्टीने काटेकोर नियोजन करून व्यवस्था उभारण्यात यावी.