शिरूर : विशेष प्रतिनिधी
जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असून शिक्षक हे जीवनाला दिशा देतात असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील शिरुर येथे केले. शिक्षकदिनानिमित्त " डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल " बाबूराव नगर शिरुर येथे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ शिक्षकांना हलवाई चौक गणेश मित्रमंडळ शिरुर यांच्या वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
यावेळी विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्ही . डी . कुलकर्णी, पोलीस आधिकारी गणेश देशमाने, मनसेचे महिबूब सय्यद, हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी रणजीत गायकवाड, जायंट्स क्लब शिरुरचे प्रा. विलास आंबेकर, भाजपाचे पदाधिकारी प्रतीक बनकर, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक नारायण काळे, महेश देशमुख आदी उपस्थित होते .
कार्यक्रमात डेक्कन स्कूल शिरुरचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज मधील भूगोल विभागातील प्रा डॉ .ज्योती भगवान धोत्रे, पांडुरंग थोरात विद्यालय आमदाबादच्या मुख्याध्यापिका स्वाती प्रकाश थोरात, विद्याधाम प्रशाला देवदैठण येथील क्रीडा शिक्षक संदीप भाऊसाहेब घावटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्कूल पुणे येथील शिक्षीका विद्या प्रल्हाद वाघमारे (सोळसे)या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसह शिक्षकांच्या आदर व सन्मान करणे गरजेचे आहे. यशासाठी नियमित अभ्यास, सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी मुख्याध्यापक व्ही . डी कुलकर्णी म्हणाले की, हलवाई चौक गणेश मंडळ सामाजिक व विधायक उपक्रम राबवित असते. मंडळाच्या शिक्षकांच्या गुणगौरव करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. शिक्षकांविषयी असणारी कृतज्ञता मंडळाने शिक्षकांच्या सन्मान करुन व्यक्त केल्याचे ते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून हलवाई चौक गणेश मित्र मंडळ दरवर्षी शिक्षकदिनाला सन्मान करीत असते. कोरोना काळात मंडळाने केलेली कामे व देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या
उपक्रमा बाबत माहिती त्यांनी यावेळी दिली .
यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची भाषणे झाली . स्वागत प्राचार्य डॉ . समीर ओंकार यांनी केले. तर आभार रणजीत गायकवाड यांनी मानले.