गेल्या २० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांना पाणी देण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही कालव्यात ५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कालवा लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

          खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके बहरात असतानाच अचानक २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याची वेळ असतानाच पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी आ. मेघना बोर्डीकर, आ. डॉ. राहुल पाटील तसेच सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी दुधना प्रकल्पातून उजव्या आणि डाव्या कालव्यात ५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. टेलपर्यंत पोहोचेपर्यंत पाणी चालू राहणार आहे. यामुळे सेलू, जिंतूर, मानवत आणि परभणी तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.