मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम; उत्पादनात मोठी घट, मदतीची गरज

/ प्रतिनिधी

गेल्या वीस दिवसापासून पावसाने खंड दिल्याने शेतातील उभी पिके वाळून जात होती. त्यातच नदीवरील डिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाणी सोडल्याने पाणीपातळी खाली गेली होती. शेतातील पिके माना टाकून देत असल्याने शेतकरी चिंतेत होता. पाणी असूनही नदीवरील मोटारी काढून टाकल्याने पाणी देता येत नव्हते. त्यातच मागील दोन दिवसांपासून शेतकरी मोटार टाकण्यासाठी पाईप, वायर जोडणी करून पिकाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु आज रविवारी (दि.४ )रोजी झालेल्या हलक्या पावसाने उभ्या पिकांना जीवदान दिले व शेतकऱ्यांत थोडा धीर आला हलका पाऊस जरी झाला तरी मोठ्या पावसाची पिकांना गरज आहे.

                  येथील गोदावरी नदीला पाण्याची आवक वाढली असून पुलाला भिडण्यासाठी फक्त दोन फूट अंतर शिल्लक असल्याचे दिसत आहे. वरच्या भागात पाऊस व जायकवाडी धरणातील सोडलेल्या पाण्याची आवक वाढल्याने अचानक गोदावरी नदी तुडुंब वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नक्कीच पाऊस पडेल अशी भावना निर्माण झाली आहे.वीस दिवसाचा मोठा खंड,त्यातच सोयाबीन पिकावर विविध कीड,बुरशी रोगाने पिकाचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्याचा मोठा खर्च यावर झाला आहे. या दोन्ही संकटाचा सामना करण्यात आर्थिक गणित बिगडून गेल्याच्या बोलल्या जात आहे. जरी आता पाऊस झाला तरी उत्तपादनात मात्र मोठी घट होण्याची शक्यता आहे . याकामी शासनाने तात्काळ आदेश देऊन आर्थिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी होत आहे.

धानोरा काळे : गोदावरी नदीला पूर आला असून जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे.