शिरुर: शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर गावच्या प्रथम सरपंचपदी २१ वर्षीय युवक सौरभ पाटीलबुवा पवार याची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे. म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक लादली गेली.
ग्रामपंचायत विभाजन करण्यात महत्वाची भूमिका असणारे काळूराम उर्फ पाटीलबुवा पवार यांचेच नाव मतदार यादीतून वगळले गेले. परंतु तरीही त्यांनी पॅनल टाकला, त्यांचा मुलगा सौरभ हा निवडणुकीला सामोरा गेला आणि जनतेनेही त्यांच्याच बाजूने कौल दिला. त्यांच्या पॅनलला ५-२ असे स्पष्ट बहुमत मिळाल्याने सौरभ पवार या २१ वर्षीय तरुणाची प्रथम सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बेट भागातील सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गावकारभारासाठी जनतेने तरुणांना पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
निवडून आलेले सदस्य ... सौरभ पाटीलबुवा पवार (सरपंच), प्रियंका जालिंदर खाडे (उपसरपंच), जालिंदर संता मुसळे, मंगल जयवंत मुसळे, निलेश पोपट नरसाळे, दामिनी हनुमंत मुसळे, मंदा सदाशिव वेताळ
या सर्व नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच आणि सदस्यांचे टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे,सरपंच अरुणा घोडे, सेवानिवृत्त सी ई ओ प्रभाकर गावडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे यांनी अभिनंदन केले.