शिरुर: शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील शिंदोडी येथे गेल्या महिनाभरापासुन बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या तसेच कुत्री यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत असुन दिवसा शेतात जायला शेतकरी घाबरत आहेत. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ धाडस करत नसुन शिंदोडी मध्ये ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे. काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे.
त्यामुळे शिंदोडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी शिरुर येथील वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना संपर्क साधुन केली होती. त्यावेळी म्हसेकर यांनी तीन दिवसात गावात पिंजरा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन ओव्हाळ यांना दिले होते. त्यानुसार आज रविवार (दि 4) रोजी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे.