जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था गेल्या दोन वर्षात ढासळली असून मटका, दारु, गुुटखा, जुगार, गांजा असे सर्वच अवैध धंदे खुलेआम सुरु असून याला पोलीस अधीक्षकांचेच पाठबळ असल्याचा आरोप गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज शनिवारी (दि.3) परभणी येथे पत्रकार परिषदेत केला. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन पोलीस अधीक्षकांच्या चौंकशी व कारवाईची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर अवैध धंदे आपोआपच बंद होतील असे वक्तव्य गंगाखेड येथे दि.29 ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या बैठकीमध्ये बोलताना आ.गुट्टे यांनी केले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्याशी चांगलाच वाद झाला होता. हफ्तेखोरीचा आरोप केल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याबद्दल आ. गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभुमीवर आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ परभणीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि.प.सदस्य गणेशराव रोकडे, माजी नगरसेवक सचिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आ.गुट्टे यांनी सांगितले की, अवैध धंदे सुरु असल्याचा परिणाम म्हणजे सध्या वाढलेली छेडखानी, चोर्‍या, गुंडागर्दी होय. या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मागणीसाठी आम्ही दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. गंगाखेड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेवून काही महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षकांना भेटलो. त्यावेळी कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रही भुमिका मांडताच पोलीस अधीक्षकांनी आम्हाला त्यांच्या दालनातून बाहेर काढले. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांविरुध्द हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काही पोलिस चांगले आहेत पण बहुतांश वरिष्ठ अधिकारी ‘एसपीं’चे ऐकत नसल्यानेच त्यांना कंट्रोल रुममध्ये बसवून ठेवण्यात आल्याचा आरोपही आ.गुट्टे यांनी केला आहे. पोलिसांच्या हफ्तेखोरीबद्दल केलेल्या विधानावर कायम असून कितीही गुन्हे दाखल झाले किंवा मला व कार्यकर्त्यांना त्रास देवून आत टाकले तरी आम्ही माघार घेणार नाही. पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असून न्याय मिळेपर्यंत आणि सर्व अवैंध धंदे बंद होईपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असून गंगाखेड तालुक्यात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गणेशोत्सवानंतर पोलीस अधीक्षकावर कारवाई अपेक्षित उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना भेटून तक्रार केलेली असून पोलीस अधीक्षक, उपअधिक्षक व संबंधित ठाणेदाराविरोधात गणेशोत्सवानंतर निश्चित कारवाई केली जाईल, असे आ.गुट्टे यांनी यावेळी सांगितले. अवैंध रेती उपशाला आपले समर्थन नसल्याचे स्पष्ट करीत कुठल्याही चुकीच्या कामासाठी कधीच पोलिसांना फोन केलेला नाही, असा दावाही त्यांनी केला