गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी
पाचोड(विजय चिडे)गौराई आली सोन्याच्या पावलांनी.. गौराई आली माणिक मोत्याचा पावलांनी.. असे म्हणत शनिवारी (दि.३) लाडक्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराई चे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेशोत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे गौरी आगमन. गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ दोन दिवसांनी गौरीचं आगमन होतं. ग्रामीण भागात गौरी पूजनाला 'महालक्ष्मी पूजन'असेही म्हणतात.
नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा हार, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीचे पूजन केले. घराघरात गौराई समोर विविध वस्तू, फळे, मिठाई, आकर्षक रोषणाईची सजावट केल्याचे दिसून आले. गौरी-गणपतीच्या निमित्ताने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले.
गौराईला भाजी-भाकरी सह भोजनाचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. त्याकरिता भाजीबाजारात महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. दरवर्षीपेक्षा यंदा मात्र भाज्यांचे दर उतरल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.गौराईची प्रतिष्ठापना करताना विविध पद्धती दिसून आल्या. काही घरात गौराई पाटावर विराजमान होत्या तर काही लोखंडी सांगाड्यावर सजावट करून केल्या होत्या. पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव व गौराईच्या सणामुळे घराघरात पुढील काही दिवस भक्तिमय वातावरण असणार आहे.