हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना एजंटांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त नोंदणी करणारे आता अडचणीत आले आहेत. बनावट गुंठेवारी, बनावट एन ए ऑर्डर जोडणाऱ्या १९ जणांवर ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एजंटाद्वारे काम करुन घेणार्यांनी शासनाबरोबर पिंपरी व पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विष्णु तुकाराम आम्ले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर व महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज) व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर येथील मेगा सेंटरमध्ये असलेल्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग २ च्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात. या कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. दस्त लिहून देणार व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतर यांनी स्वत:चे फायद्याकरीता दस्तास बनावट नियमितीकरण दाखल जोडून तो नोंदणी करुन सहायक दुय्यम निबंधक व पुणे महापालिकेचे उप अभियंता बांधकाम विकास विभाग यांची फसवणूक केली.

अशाच प्रकारे बनावट एन ए (अकृषिक परवानगी) जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भिमाजी कर्हे, सिताराम कर्हे, मंगल कर्हे, मंगळ कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालींधर मिसाळ, लता राजाराम कोळपे यांच्यातर्फे करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ डिसेबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान घडला होता.

बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखला जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुषपवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे, कल्पना खंडुजी कदम यांच्या तर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट एन ए (अकृषीक परवानगी) ऑर्डर जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फ जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़) आणि श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फ भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज), हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

दस्ताला बनावट एन.ए. (अकृषीक परवानगी) जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर गोविंद कडु (रा. सुखसानगरनगर, कात्रज), तसेच सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फ प्रो. प्रा. निखील किसन सातव (रा. वाघोली) व त्यांना मदत करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले असून हडपसर पोलीस तपास करीत आहेत.