यवतमाळ : आरोग्य विभागाच्या योजनांसह आजारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रसिद्घी साहित्याची थेट रद्दीत विक्री करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अशोक जयसिंगपुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे लेखी तक्रारच केली असून, विशेष समितीकडून चौकशीसह पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरर तीन विभागांतर्गत प्रसिद्घी साहित्याची छपाई होते. पुणे येथून आलेले व जिल्हा स्तरावर छपाई केलेले साहित्य परस्पर बाहेर ठेवले जाते. काही साहित्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात अडगळीत ठेवले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वाटप केल्या जात नसल्याचा आरोपही केला जात आहे. कार्यक्रम संपल्यावर सदर साहित्याची रद्दीत विक्री केली जाते. कोविड काळात प्रसिद्घी साहित्य कुठल्या वाहनाने गावपातळीवर व पीएचसीस्तरावर पाठविले याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.