नाशिक : तब्बल दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला उधाण आले असताना या उत्सवावर संसर्गजन्य आजारांचा प्रभाव दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार डेंगीचे ९१ रुग्ण आढळून आले आहे, तर स्वाइन फ्लूचादेखील प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

नाशिक रोड भागात सर्वाधिक डेंगीचा प्रभाव दिसत असून, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे गरज निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात नागरिकांना उत्सव साजरा करता आला नाही, मात्र कोरोना लाट ओसरल्यानंतर घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्याची लगबग दिसून येत आहे. मात्र, एकीकडे उत्साह असला तरी दुसरीकडे मात्र संसर्गजन्य आजारांनी तोंड वर काढण्यास सुरवात केली आहे.

डेंगी हा संसर्गजन्य आजार नाही, मात्र नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सर्वाधिक नाशिक रोड भागात रुग्ण मागील आठवड्यात आढळून आले आहेत. नाशिक रोडमध्ये ४२, सिडको विभागात ३२, पंचवटी विभागात ३०, पूर्व विभागात २५, सातपूर विभागात २३, तर पश्चिम विभागात १२ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहे. शहरात योग्य पद्धतीने पेस्ट कंट्रोल होत नसल्याने डेंगी रुग्ण आढळत असल्याचे बोलले जात आहे.

चिकूनगुनियाचा प्रादुर्भाव

स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या बळींचा आकडा १६वर पोचला आहे. यात महापालिका हद्दीतील सहा, तर ग्रामीण भागातील चार मृतांचा समावेश आहे. पाच मृत नगर व एक मृत पालघर जिल्ह्यातील आहे.

चिकूनगुनियाचे १०८ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यातील सतरा जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच चिकूनगुनियाचे २०९ रुग्ण आढळले होते. यंदाही आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.