केज (प्रतिनिधी) बलात्कार आणि अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसलेल्या पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांची माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भेट घेऊन या प्रकरणी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहेत.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यात एका परित्यक्ता महीलेवर एका राजकीय पक्षांचा कार्यकर्ता सुग्रीव कराड याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा दोन वेळा गर्भपात केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही. म्हणून पीडित महिला तिचे वृद्ध आई-वडील यांच्या सोबत ती दि.30 ऑगस्ट पासुन अमरण उपोषणाला बसली आहे.
दरम्यान उपोषणाच्या काल तिसऱ्या दिवशी केज विधानसभेचे माजी आमदार मा. पृथ्वीराज साठे यांनी उपोषणस्थळी अमरण उपोषणास बसलेल्या पीडित महिला आणि तिचे आई-वडील यांची भेट घेतली. या प्रकरणी माजी आमदार पृथ्वीराज साठे हे पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करणार आहेत.