बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमनांवर कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली आहे. या पथकाने शुक्रवारी बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमनांवर धडक कारवाई केली. त्यामुळे बदलापूर बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अमित सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत बदलापूर पश्चिम बाजारपेठेत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना तेथून हटविण्यात आले. काही विक्रेत्यांनी थाटलेली टपरी वजा दुकानेही तोडण्यात आली. अनेक दुकानदारांनी दुकानासमोर अनधिकृतपणे शेड उभारून अतिक्रमण केले होते. या शेडही तोडण्यात आल्या. अनेक दुकानदारांनी दुकानासमोरच्या फुटपाथवर लोखंडी जाळ्या टाकून तसेच त्यावर दुकानाचे साहित्य ठेवून फुटपाथ अडवले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून ये-जा करण्यास अडथळा होत होता. मात्र अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई सुरू केल्याचे समजताच अशा दुकानदारांनी तातडीने या लोखंडी जाळ्या काढून घेतल्या. तसेच फुटपाथवर मांडलेले साहित्यही दुकानात घेतले. तर रस्त्यालगत फुटपाथवर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांनीही लगबगीने सामानाची आवराआवर केली. त्यामुळे फुटपाथ मोकळे झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमनांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. परंतु केवळ एक -दोन दिवस कारवाई करून न थांबता सातत्याने शहर अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी (ता.२८) बदलापूर पूर्व भागातील स्टेशन- कात्रप रस्त्यावरील अतिक्रमनांवर कारवाई केली होती.
त्यानंतर शुक्रवारी पश्चिम भागात कारवाई करण्यात आली.