परभणी/प्रतिनिधी:-सात वर्षापुर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना सरकारी कर्मचार्याच्या गणवेशाचा खिसा फाडून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल होवून खटला चालविण्यात आला. यातील आरोपी राजेश भालेराव यास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन महिने कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल परभणी जिल्हा सत्र न्यायालयाचे तदर्थ सत्र न्यायाधीश दुसरे प्रशांत खरवडे यांनी आज मंगळवारी (दि.30) दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील कुंभारी शिवारात आर्वी ते कुंभारी जाणार्या रस्त्यावर 6 सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी 5 वाजता वाहक परशुराम देशमुख व चालक गाडे हे बसमध्ये कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी प्रवासी राजेश भालेराव यास वाहक देशमुख यांनी बसचे तिकीट घे असे म्हटले असता आरोपीने बसचे तिकीट न घेता वाहकास तू बसचे तिकीट कसे मागतो? मी गावचा दादा आहे असे म्हणून तिकीट न घेता वाहकाच्या हातातील तिकीटाचे पैंसे असलेली शंभर व वीस रुपयांची नोट फाडली. तसेच वाहक हा सरकारी गणवेशात असताना त्याच्या शर्टचा खिसा फाडून बटन तोडून मारहाण व शिवीगाळ केली होती. याबाबतची फिर्याद वाहक देशमुख यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासी अधिकारी पोहेका दिपक भुसारे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अभियोग पक्षाकडून दोषसिध्दी करण्यासाठी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सरकारी वकीलांचा युक्तीवाद् ग्राहय धरून तदर्थ सत्र न्यायाधीश-2 प्रशांत खरवडे साहेब आरोपीस दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डी.यु. दराडे यांंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील अॅड. मयुर साळापुरकर यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि कपील शेळके, पोउपनि सुरेश चव्हाण, मपोह आशा थायडे यांनी सहकार्य केले.