माजी खासदार तथा संपर्कप्रमुख सुरेश जाधव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट

परभणी-जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जागोजागी शेतात पाणी साचल्याने पिकांची जाग्यावरच नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परभणी जिल्हा अनुदानातून वगळल्याने माजी खासदार तथा शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख सुरेशराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकर्‍यांना अनुदान मिळावे यासाठी प्रश्न लावून धरला होता. शासकीय यंत्रणेने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरीही कर्मचार्‍यांच्या पथकांडून नुकसानीचा आकडा कमी दाखवला जात आहे. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. यासाठी 30 ऑगस्ट रोजी मुंबई येथे दुसर्‍यांदा सुरेशराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अतिवृष्टीच्या अनुदानाचा प्रश्न लावून धरला आहे. शासकीय यंत्रणा शेतकर्‍यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मुग, तूर यासह खरीप हंगामातील पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकर्‍याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतात पिकांसाठी केलेला खर्चही निघने कठीण झाले असून शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढावलेले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असतानाही कागदी घोडे नाचवत शेतकर्‍यांच्या तोंडाला पानेपूसण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड रोष निर्माण झाला आहे.