नाशिक : मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला बुधवारी (ता. ३१) सुरवात झाली. ढोलताशांच्या गजरात गणरायाचे आगमन होत असताना भाविकांकडून जल्लोष करण्यात आला. घराघरांत गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर मंडळांकडूनही बाप्पांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक, दोन, तीन, चार...गणपतीचा जयजयकार’ च्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले होते.
कोरोना महामारीमुळे सण- उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आलेल्या होत्या. परंतु, आता निर्बंध शिथिल झालेले असताना कौटुंबिक तसेच मंडळाच्या स्तरावर गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून आरास सजावटीची लगबग अखेरच्या दिवसापर्यंत सुरू राहिली. बुधवारी सुरेख असे देखावे साकारताना भाविकांनी गणरायांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती.
अशात सकाळी सातपासून बाप्पाला घरी विराजमान करण्याची भाविकांची लगबग बघायला मिळाली. वाजत-गाजत बाप्पाला घरी आणत प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत शहर परिसरात बाप्पांच्या आगमनाचा धूमधडाका सुरू राहिला. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहराचे वातावरण चैतन्यमयी झाले होते.
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, त्र्यंबक रोडवरील गोल्फ क्लब मैदान परिसर तसेच द्वारका भागातील पौर्णिमा परिसर येथे भाविकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली. श्रींच्या मनमोहक रुपाचा शोध घेताना भाविकांचा या ठिकाणी वावर बघायला मिळाला. अनेक भाविक आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्रींना घरी नेण्यासाठी आले होते. शहर परिसरात ढोल-ताशांचा गजर ऐकायला मिळाला.
पारंपरिक पेहराव लक्षवेधी
गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी पारंपरिक पेहराव घातला होता. अगदी गणरायाचे आगमन झाल्यापासून दिवसभर पारंपरिक वेशभूषेत भाविकांचा शहर परिसरात वावर बघायला मिळाला. कुर्ता, टोपीमध्ये चिमुकल्यांपासून ज्येष्ठ लक्ष वेधत होते.
रेडिमेड मोदकला वाढली मागणी
बाप्पाचा आवडीचा प्रसाद असलेल्या मोदकला मागणी वाढलेली होती. यावेळी माव्याचे मोदक तसेच उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, चॉकलेट मोदक असे मोदकाचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दीड दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन
दहा दिवसांच्या या उत्सवात काही भाविकांकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी श्रींची प्रतिष्ठापना केली जात असते. त्यानुसार दीड दिवसाच्या गणपतीचे गुरुवारी (ता.१) विसर्जन केले जाईल. तीन, पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन त्या-त्या दिवशी केले जाणार आहे.