नाशिक : नाशिक शहरात विघ्नहर्ता गणरायाचे प्रफुल्लित अन् वाजत-गाजत बुधवारी (ता. ३१) स्वागत करण्यात आले. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यादरम्यान भाविकांना अनुचित प्रकाराची वा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्याची तत्काळ १०० वा ११२ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांनंतर गणेशाचे बुधवारी वाजतगाजत अन् जल्लोषात घरोघरी आगमन झाले. सदरील गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठाही बहरल्या असून, गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्न पार पडावा, यासाठी शहर पोलिस दलाकडून गणेश मंडळाजवळ पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला आहे.

तसेच पोलिस ठाणेनिहाय पेट्रोलिंग केली जाणार आहे. सर्वच सार्वजनिक गणेश उत्सवांजवळ फिक्स पॉइंट बंदोबस्त असणार आहे. आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदाराच्या व्यतिरिक्त धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १०० पुरुष अंमलदार, ५० महिला अंमलदार तसेच ८०० पुरुष होमगार्ड व २५० महिला होमगार्ड, यासह राज्य राखीव पोलिस दलाची १ कंपनी असा सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उत्सव काळात शहर पोलिस हे नागरिकांच्या मदतीकरिता महत्त्वाच्या चौका-चौकात उपलब्ध असतील. तातडीची मदत आवश्यक असल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास १०० नंबरवर संपर्क साधण्याचेही आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात ३७६ सार्वजनिक गणेश मित्र मंडळांनी ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी पोलिसांकडून परवानगी घेतली आहे.

३० विसर्जन स्थळे, ४२ कृत्रिम तलाव

गणेश विर्सजनासाठी शहर परिसरात ३० ठिकाणी महापालिकेने व्यवस्था केली आहे. येथे जीवरक्षक तैनात असतील. यासह सुमारे ४२ ठिकाणी गणेशमूर्ती विजर्सनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या दरम्यान पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस ठाणे प्रभारी पेट्रोलिंग करणार आहेत.

मौल्यवान चीजवस्तू सांभाळा

गणेशोत्सवानिमित्त गणपती व देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडताना कुटुंबांतील सर्वांनी एकत्र बाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी दागिणे, पर्स, पाकिटे व्यवस्थित सांभाळावे. तसेच सोबत असलेल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, असेही आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.