मालेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास शिवाजी ताजणे यांचा 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती झाल्यानिमित्त 30 ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आज दि.31 ऑगस्ट रोजी विलास ताजणे यांचा मालेगाव पोलीस ठाण्यात ठाणेदार किरण वानखेडे व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झालेले विलास शिवाजी ताजणे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या राजगड गावात एका गरीब कुटुंबात झाला.प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी बी. ए. ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी लष्करी नोकरी स्वीकारली.पाच वर्षांच्या लष्करी सेवेनंतर निवृत्ती घेऊन ते १९९१ मध्ये अकोला जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग बोरगाव मंजू येथे झाली. त्यानंतर त्यांची शिरपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. तेथे त्यांनी सुमारे 17 वर्षे सेवा बजावली, याच दरम्यान त्यांना हवालदार ते पोलिस नायक आणि पोलिस नायक ते पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून बढती मिळाली, मालेगाव पोलीस ठाण्यात सेवेत असताना त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली, त्यांच्याकडून तपास करण्यात आलेली प्रकरणे कंवेक्शन पर्यंत पोहोचल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांचा अनेकदा गौरवही केला होता. जीवनातील शिक्षणाचे महत्त्व समजणाऱ्या विलास ताजणे यांनी मुलांना शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्या मोठ्या मुलीने एम.फार्म. लहान मुलीने बी. ई. आणि मुलाने डी. फॉर्म चे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यांच्या ३१ वर्षांच्या निष्कलंक पोलीस सेवेनंतर ते आज ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व मालेगावचे ठाणेदार किरण वानखेडे यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.