परळी (दि. 30) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत यावर्षी वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे जोरदार नियोजन करण्यात आले असून या गणेशोत्सवात, श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व उत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कला, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

उद्घाटन संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राच्या तारका हा लावण्यवतींचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, वैशाली जाधव, पूनम कुडाळकर, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड आदी तारका आपल्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत. 

गणेशोत्सवात पुढील 10 दिवस कला, सांस्कृतिक, सामाजिक आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून परळीकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार असून, नाथ प्रतिष्ठाणचा यंदाचा गणेशोत्सव राज्यात गाजावा, असे उत्कृष्ट नियोजन धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

श्रींची प्रतिष्ठापणा व गणेशोत्सव उद्घाटन हे बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. मोंढा मैदान येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर आबा चव्हाण, युवा नेते अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, माजी नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, ज्येष्ठ नेते राजकिशोर पापा मोदी, रा. कॉ. चे मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, पंचायत समितीचे सभापती पिंटू मुंडे, बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, दीपक देशमुख, प्रा. विनोद जगतकर, जाबेर खान पठाण, यांसह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

गणेशोत्सवात दुसऱ्या दिवशी दि. 01 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळ, भारुड व गवळणी असा सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 02 सप्टेंबर रोजी, साबरी ब्रदर्सचा कव्वाली मुकाबला, दि. 03 सप्टेंबर रोजी अजय-अतुल लाईव्ह कॉन्सर्ट, अमृता खानविलकरसह, दि. 04 सप्टेंबर रोजी आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम, दि. 05 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्य जत्रा, दि. 06 ऑगस्ट रोजी बॉलीवूड सिनेतारका ईशा देओल, मानसी नाईक आदींचा लावण्य जल्लोष, दि. 07 सप्टेंबर रोजी मराठी विनोदाची ओळख असलेला चला हवा येऊ द्या, तर दि. 08 सप्टेंबर रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रबोधनपर कीर्तन संपन्न होईल. 

अशा एकापेक्षा एक मनोरंजात्मक कार्यक्रमांची पुढील दहा दिवस परळीत रेलचेल असणार आहे. या गणेशोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर परळीत येणार होत्या मात्र काही व्यक्तिगत अडचणीस्तव श्रद्धाने येऊ शकणार नसल्याचे कळवले असून, एका व्हीडिओच्या माध्यमातून समस्त परळीवासीयांची दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती, तसेच श्रींची प्रतिष्ठापणा ते श्रींच्या विसर्जनापर्यंत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी केले आहे.