आ. सुभाष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

सोलापूर:-  १२३ टीएमसी इतका प्रचंड पाणीसाठा करू शकणारे उजनी धरण संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव व्दितीय आहे. सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखानदारीसाठी उजनी धरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र टफूट, भेगा यामुळे वितरणव्यवस्थेमध्ये उजनीची पाणी गळती दिवसेंदिवस वाढतच आहे. सुमारे 5 टीएमसी पाणी वाया जात आहे.   याच्या वितरण व्यवस्थेतील दुरूस्तीसाठी यावर्षी केवळ २९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ती अतिशय त्रोटक आहे. वेळेवर डागडुजी न केल्यास भविष्यात त्याच बाबींवर अनेक पट खर्च होणार आहे. तरी याची दखल घेऊन किमान  १०० कोटीची तरतूद उजनी कालवा दुरूस्त करण्यासाठी  करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  भेट घेऊन केली आहे. उजनी  धरणावर सोलापूर, अहमदनगर, पुणे, धाराशिव जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. केवळ सोलापूर जिल्हयातील या २०२१-२२ हंगामात ऊस गाळपाचे ताज्या आकडेवारीनुसार २०१.६४ लाख मेट्रिक टन ऊसगाळप झाले आहे. यामध्ये उजनी प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत एकूण एकंदरीत उजनी प्रकल्प निर्माण करण्यात  २६०० कोटी खर्च करण्यात आलेला असुन या हंगामातील ऊस गाळपातून  ४०३२ कोटी निर्माण झाले. अशा प्रकारे या प्रकल्पाने गेली कित्येक वर्षे अनेक पटीत परताव दिला आहे.

उजनी प्रकल्पातील कालवे, वितरण व्यवस्थेचा गेल्या ४० वर्षात सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना अर्थ वाहिन्यांसारखा उपयोग होत आहे. मुख्य कालवा, उजब कालवा, डावा कालवा, वेगमपूर शाखा कालवा, कुरूल कालवा, मोहोळ कारचा शाखा अशी केवळ मुख्य कालवा, शाखा कालवा यांची लांबीच ५४८ कि.मी. इतकी असुन वितरिका, उपवितरिका यांची लांबी २१०० कि.मी. आहे. या २६४८ कि.मी. लांबीच्या कालव्यांवर ६० जलसेतू, १७३४ पूल, २१५ लादीमोरी, ९५ सायफन, ३१ अतिवाहक, ७५० शिर्षनियामक, ४०६१ विमोचके आहेत. याशिवाय फुटबीज, रेल्वे कॉसींग, फॉल्स आदी लहान मोठया बांधकामांची संख्या ९२२० आहे.

मात्र सध्या वाढलेली वाहतूक, दळणवळण, अतिवृष्टी, बदलत्या वातावरणात उजनीच्या वितरण व्यवस्थेमध्ये पाणी गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे साधारण पंचवीस टक्के पाणी गळती होत आहे. हे 5 पटीएमसी पाणी वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. या पाण्याच्या गळतीमुळे पाणीपट्टीचा शासनाचा महसूल दरवर्षी बुडतो शिवाय त्यामुळे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित राहते. अशा वितरण व्यवस्थेतील दुरूस्तीसाठी यावर्षी केवळ  २९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ती अतिशय त्रोटक आहे. वेळेवर डागडुजी न केल्यास भविष्यात त्याच बाबींवर अनेक पट खर्च होणार आहे. तरी याची  दखल घेऊन किमान १०० कोटीची तरतूद उजनी कालवा दुरूस्तीसाठी करावे असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आमदार देशमुख म्हणाले.