ताडकळस/प्रतिनिधी:-लाडक्या गणपतीचे 31ऑगस्ट रोजी तर 3 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचे आगमन होत आहे. यासाठी सर्वत्र जय्यत तयारी चालू असून, गौरी गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे.
कोरोनामुळे मागील काही वर्ष बाजारपेठेवर निर्बंध ठेवण्यात आले होते. यावर्षी शासनाने पूर्णतः निर्बंध उठवल्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ नव्या जोमाने सज्य झाल्या आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, गणेशमूर्ती, सजावट साहित्य, महालक्ष्मी मुखवटे, साड्या, विद्युत लायटिंग इत्यादी साहित्याने ताडकळस बाजारपेठ सजले असून, गणेश मंडळ आणि ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसत आहे.
मूर्तीच्या उंची बदल सरकारने सुट दिल्यामुळे यावर्षी छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या असून मोठ्या मूर्तीचा बोलबाला असल्याचे दिसत आहे.
ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 49 गावे आहेत. प्रत्येक गावात एक गाव एक गणपती संकल्प राबवावा असे आवाहन ताडकळसचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी शांतता बैठकीत केले.