सोलापूर : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, उपजिल्हाप्रमुख हरिदास चौगुले, तुकाराम मस्के, माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी इच्छुकांचा बायोडेटा यावेळी घेण्यात आला प्रत्येक तालुक्यातून अनेकांनी इच्छा व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळालं शेवटी समन्वयाने निवडी केल्या जाणार आहेत.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना शिवाजी सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सोलापूर जिल्हाप्रमुख शहर प्रमुखाच्या निवडी केल्या आहेत त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मंगळवारी शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. लवकरच तालुका प्रमुखांच्या निवडी केल्या जाणार असून सर्वांच्या समन्वयाने पदे देण्यात येणार आहेत आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्ह्यात सज्ज असल्याचे सावंत यांनी सांगितले.