परळी (प्रतिनिधी) दाऊदपूर शिवारात असलेल्या औष्णिक वीज केंद्राच्या राखेच्या तळ्यात जिलेटिन च्या साह्याने स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने दखल घेत सोमवारी पाहणी केली.

राखेच्या तलावात स्फोट करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर याची पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. औरंगाबादच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, एटीएसचे पीआय खंदारे ,एपीआय शितल चव्हाण यांच्यासह बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते.शिवाय बॉम्ब शोध व नाशक पथकाने राख तलावाची पाहणी केली.

एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा, अंबाजोगाई चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये परळी ग्रामीण एपीआय मारुती मुंडे हे ही यावेळी उपस्थित होते.परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राख तलाव परिसरास भेट दिली. जिलेटीन जप्त करण्यात आल्याने या मागे कोणाचा हात असू शकतो यावर चर्चा करण्यात आली.दरम्यान राख तलाव परिसरात स्फोट करण्यासाठी आलेल्या दोघांना औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.

मात्र ब्लास्टिंग चे काम देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर व राख वाहतूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही.औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था चोख आहे, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.