पावसाचा पुन्हा रौद्रावतार: पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले; दोघांचे मृतदेह सापडले
वाशिम : (नितीन थोरात ) गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसंच वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेले चार जण वाहून गेले. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून इतर दोघांचा अजून शोध सुरू आहे.एकबुर्जी धरणाच्या सांडव्यात तरुण वाहून गेलेले असतानाच दुसरीकडे मोठा उमरा परिसरात दुपारी झालेल्या जोरदार पावसात वीज कोसळून गुरे चारण्यासाठी गेलेल्या सिद्धार्थ भगवान भालेराव (वय १६ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या दोन दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहेभटउमरा परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याने पूस नदीला जोडणाऱ्या नाल्याला पूर येऊन वाशिम येथून गावी जाणारे नागरिक अडकले आहेत.
एकबुर्जी धरण १०० टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या सांडव्याच्या परिसरात असलेल्या धबधब्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात. मात्र प्रशासनाकडून धोका लक्षात घेऊन तिथे जाण्यास मनाई करण्यात आली होती. प्रशासनाने केलेल्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून शहरातील रजनी चौक परिसरातील पाच ते सहा युवक सांडव्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी चार जण वाहून गेले असून नागरिकांच्या मदतीने दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.