वेळास समुद्र किनारी सापडली पोषण आहारातील फोडलेली चणा पाकीटे...
दिघी, बोर्लीपंचतन विभागातील अंगणवाडी केंद्राना झाला होता धान्य पुरवठा
समुद्रकिनारी पाकीट आली कशी यात नक्की काय गौडबंगाल
प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
बोर्ली पंचतन- वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील काही अंगणवाडी केंद्राना काल रविवार 28 ऑगस्ट रोजी बालकांसाठी पोषण आहारासाठी धान्य पुरवठा करण्यात याचवेळी महाराष्ट्र शासनाचे नाव असलेली चणा पाकीट वेळास आदगाव रस्त्यावरील समुद्र किनारी फोडलेली व पाकिटात चणा पसरलेल्या स्थितीत आढळली त्यामुळे अंगणवाडी मधील बालकांना देण्यात येणारा पोषण आहारातील धान्य पाकिटे समुद्र किनारी कशी आली की कालबाह्य झालेला चणा पाकिटावरील तारीख दिसू नये म्हणून तर पाकिटे बदल केली असल्याबाबत नागरिकांतून शंका व्यक्त करण्यात येत असून सदर प्रकार हेल्प ग्रुप वेळास चे अध्यक्ष धवल तवसाळकर यांनी उघडकीस आणला आहे. तर सदर प्रकाराची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, बोर्ली पंचतन, बागमंडला विभागातील अंगणवाडी केंद्राना पोषण आहारासाठी काही महिन्यांपूर्वी पोषण आहारातील धान्य वाटप करण्यात आले यातील चणा हे निकृष्ट दर्जाचे आल्याने ते परत पाठवून बदलून मिळावे अशी मागणी करण्यात आली होती हाच बदलून देण्यात येणारा चणा रविवार दिनांक28 ऑगस्ट रोजी ठेकेदाराकडून अंगणवाडी केंद्राना वाटप करण्यात आला आणि नेमके याच वेळी वेळास आदगाव मार्गावर चणाची काही पाकीट रिकामी फोडलेली व अन्य पिशवीत काही प्रमाणात चणा त्या ठिकाणी टाकून निघून गेल्याची माहिती हेल्प ग्रुप वेळासचे अध्यक्ष धवल तवसाळकर यांना मिळाली. यावर तवसाळकर यांनी घटनास्थळी जात या प्रकाराची माहिती व्हिडीओ करीत सोशल माध्यमाद्वारे सर्वत्र पसरविली, धवल तवसाळकर यांना मिळालेल्या पाकिटावर जून 2022 ची पॅकिंग केल्याची तारीख असून 3 महिने आधी वापरावी असे लिहिले आहे. रविवारी वाटप करण्यात येणारा चणा तो हाच आहे का? आणि हाच असेल तर बालकांना पोषण आहारामध्ये हाच चणा शिजवून दिला जाणार का? पुरवठा धारकाने पुरवठा केलेला चणा हाच असेल तर पाकीट समुद्र किनारी कशी आली? यात पुरवठा करणाऱ्या ठेकेदारचा काही हात नाही ना अशा शंका व्यक्त करण्यात येत आहेत. श्रीवर्धनच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अमिता भायदे यांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी घटना स्थळी जाऊन झालेल्या प्रकाराचा पंचनामा केला यावेळी विस्तार अधिकारी भरत कुबेर, वेळास सरपंच आशुतोष पाटील, ग्रामस्थ निलेश पाटील, मुरलीधर पवार, सुदर्शन शिलकर उपस्थित होते, जर बालकांच्या जीविताशी कोणता प्रश्न उपस्थित झाला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न तवसाळकर यांनी उपस्थित केला आहे. जर अशा प्रकारचा चणा अंगणवाडी केंद्राना वाटप झाला असेल तर तो त्वरित बदलून मिळावा. अशी मागणी धवल तवसाळकर यांनी केली आहे.
अमिता भायदे
श्रीवर्धन प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक बाल विकास योजना श्रीवर्धन
आम्ही वस्तुस्थितीचा पंचनामा केला असून याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठवू.
धवल तवसाळकर,
अध्यक्ष हेल्प ग्रुप सामाजिक संस्था वेळास
पोषण आहारातील रिकामी व काही चणा असलेली पाकीट आम्हाला वेळास किनाऱ्यावर सापडली. सदर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून प्रत्येक अंगणवाडीस नवीन व चांगल्या दर्जाचे धान्य बदलून मिळावे.
वस्तुस्थितीचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमिता भायदे, विस्तार अधिकारी भरत कुबेर, वेळास सरपंच आशुतोष पाटील, धवल तवसाळकर व ग्रामस्थ