स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वेळोवेळी महामार्गाच्या समस्ये संदर्भात पत्र दिले तरीही याची दखल घेतली गेली नाही परंतु खासदार येणार म्हटल्यावर हेच प्राधिकरण आपला लवाजमा घेऊन रस्त्यावर देखभाल करण्यासाठी दाखल झाले यावरून हा विभाग जनतेच्या प्रश्नाकडे किती गांभीर्यपूर्वक विचार करते याचा प्रत्येय येतो.त्यामुळे या परिसरातील जनता खासदार महोदयांनी वारंवार भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते आहे किमान त्यांच्या आगमनामुळे महामार्गाची नियमित देखभाल होईल अशी खोचक प्रतिक्रिया या भागातून पुढे येत आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर पंधरा नंबर हडपसर पासून उरुळीकांचन या दरम्यान रस्त्यावर अनेक अडचणी निर्माण झाल्या.या मार्गावर टोल वसूली चालू असताना रस्त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत असे हा रस्ता शासनाकडे हस्तांतरित करताना अतिशय चकचकीत करुन देण्यात आला त्यामुळेच यावर कुठलाही अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता भासली नाही दरम्यानच्या काळात रस्त्याच्या बाजुस झुडूपे वाढत गेली तर कडेला व दुभाजकाजवळ माती व वाळूचे थर साचले.याचा दुचाकीस्वारास मोठा त्रास सहन करावा लागला.पावसाळ्यात याचाच चिखल झाल्याने वाहने घसरुन पडण्याचे अपघात वाढले.यावर स्थानिक स्वराज्य संस्थेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना लेखी तक्रारी करुनही यावर कसलीच कारवाई नाही.
विशेष म्हणजे या मार्गावरुन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जातो.कोरोना प्रतिबंधानंतर यावर्षी हा सोहळा पार पडला त्यावेळी या महामार्गावरील हे अडथळे हटविणे आवश्यक होते परंतु ते त्यानी केलेच नाही.लोणी-काळभोर येथे हा सोहळा मुक्कामी येणार त्यादिवशी जोरदार पाऊस पडला त्यावेळेस लोणीफाटा ते एम आय टी काॅर्नर या दरम्यान पुलावरील एक बाजु पाणी साठल्याने वाहतूकीस अडथळा ठरत होती महामार्गाची दुरुस्ती कामे झाली नसल्याने हे पाणी तहसीलदार व स्थानिक ग्रामपंचायत यांनी पंपाने उपसून काढले.
गेल्या आठवडय़ात या रस्त्यावर दोन अपघात झाले यात दोन शाळकरी मुली व एक युवक मृत्युमुखी पडला यावर स्थानिक नागरिक आक्रमक झाले. त्यानंतर खासदार या भागात पाहणी करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर पोहोचले व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.