सोलापूर : बाळीवेस येथील महापालिकेअंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये महापालिकेला दोन मजले ताब्यात मिळणार आहेत. त्याठिकाणी महापालिका प्रसूतीगृह आणि खाजगी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या बाळवेस येथेपूर्वीच्या राजूबाई मॅटरनिटी होम या ठिकाणी बीओटी प्रकल्प अकरा वर्ष झाले रखडले होते. सन 2011 पासून हे काम प्रलंबित होते. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प प्रलंबित होता. अखेर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत हा प्रकल्प मार्गी लावला. येत्या दीड महिन्यात या बीओटी प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे.
मंत्रीचंडक कन्स्ट्रक्शन यांच्याकडे हा प्रकल्प दिला आहे. बांधा - वापरा- हस्तांतरित करा ( बीओटी ) या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या बीओटी प्रकल्प अंतर्गत एकूण 3 हजार 599 चौरस मीटर बांधकाम करण्यात येत आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या इमारतीतील तिसरा व चौथा मजला महापालिकेच्या ताब्यात मिळणार आहे. तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्रसुती गृह सुरू पूर्ववत करण्यात येईल तर चौथ्या मजल्यावर खाजगी हॉस्पिटलसाठी जागा लिलावाद्वारे महापालिका भाड्याने देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या ताब्यात येणारा तिसरा मजला हा 295 चौरस मीटर क्षेत्रफळ तर चौथ्या मजल्याचे 731 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे बरीच वर्ष रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागला. येत्या दीड महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार असून या ठिकाणी महापालिकेचे प्रसूती गृह तसेच खाजगी हॉस्पिटल सुविधा नागरिकांना मिळू शकणार आहे.