शिक्षण विभागाचे दुर्लक्ष 

वैजापूर

________________________

वैजापूर तालुक्यातील पालखेड केंद्रांतर्गत असलेल्या करंजगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. या शाळेतील चार वर्गखोल्या पुर्णपणे मोडकळीस आल्याने ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.‌ या खोल्या कधीही पडु शकतात अशी अवस्था झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासनाकडुन याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक हवालदिल झाले आहेत. वैजापूर तालुक्यात पालखेड केंद्रांतर्गत करंजगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी प्राथमिक शाळा असुन या शाळेत चार वर्गखोल्या आहेत. मात्र या वर्गखोल्या मुलांना बसण्याच्या अवस्थेत नाहीत. खोल्यांमध्ये अनेक वेळा सरपटणारे प्राणी आढळुन आले आहेत. खोल्यांच्या बांधकामास तडे गेले आहेत. त्यामुळे हे बांधकाम पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छतावरील पत्रे कुजल्यामुळे पावसाळ्यात पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन ज्ञानार्जनात अडथळा येतो. शाळेच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळवले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीने याबाबत ठराव घेऊन शाळेच्या तीन हजार वर्गफुट जागेवर पाच वर्गखोल्या बांधण्यासाठी मुख्याध्यापक, सरपंच व ग्रामसेवक यांनी स्थळदर्शक नकाशा सादर केला आहे‌. यावर कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांसह उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.