मुंबई :- (प्रतिनिधी )पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून आज औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना एकमुखाने मंजूरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला.

खरं तर राज्यातील ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथील विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय कायम ठेवला होता. 

विधानसभेत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव धारशिव करण्यात आलं आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं नामकरण करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव करण्यावरून काही संघटनांचा आक्षेप आहे. एमआयएमचाही यास तीव्र विरोध आहे. मात्र नामांतराची प्रक्रिया आता आणखी एक पाऊल पुढे सरकल्याचे दिसून येत आहे. या दोन शहरांसोबत नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील विमानतळ असे नामांतर करण्याच्या ठरावालाही मंजुरी देण्यात आली आहे.