यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शल्य चिकित्सा विभागाच्या एका विद्यार्थ्याचा पाच सिनिअर डॉक्टरांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांच्याकडे करण्यात आली आहे. ही तक्रार पीडित विद्यार्थ्याच्या आईने केली आहे. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी चार विभाग प्रमुख डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे. विद्यार्थी हा यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्य चिकित्सा विभागाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे सिनिअर्स त्याची रॅगिंग घेत असून त्याचा शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. याबाबत नॅशनल रॅगिंग सेलकडे तक्रार केली होती. परंतु, त्यावेळी दबाव आणला गेला. रॅगिंग घेणार्‍या पाच डॉक्टरांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. ओपीडी किंवा वॉर्डमध्ये कोणतेही काम नसताना पीडिताला होस्टेलवर जाऊ दिले जात नाही.डॉक्टरांच्या खोलीतच थांबायला भाग पाडतात. यातील गंभीर बाब म्हणजे सिनिअर डॉक्टर्स त्याला रात्ररात्र पायावर उभे राहायला सांगतात. त्यामुळे त्याला पाठीचे दुखणे झाले आहे. पायाला इजा झाली आहे.  ड्यूटीवर ज्वाइन होण्यासाठी गेला असता त्याला अधिकृतपणे रुजू करून घेण्यात आले नाही.अशाप्रकारे होणारा मानसिक व शारीरिक त्रास हा आमच्या सहनशीलतेपलीकडचा असून या प्रकरणी न्याय देण्यात यावा, अशी मागणी पीडित विद्यार्थ्याची आई जुही भामभानी यांनी केली आहे.