शिरुर: गेली काही दिवसांपासून बंद असलेली पारगाव तर्फे आळे ते पुणे एस.टी बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी या संदर्भातील निवेदन वडनेर खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने शिरूर येथील आगारप्रमुख शिर्के यांना देण्यात आले.
कोरोना काळातील प्रवाशी संख्या घटून मोठे नुकसान झाल्याने सदरची एस.टी. बस सेवा बंद करण्यात आल्याने साकोरी, पारगाव तर्फे आळे, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी, वडनेर खुर्द, टाकळी हाजी, माळवाडी, डोंगरगण, आमदाबाद, मलठण, वाघाळे, वरुडे, गणेगाव, बुरुंजवाडी, शिक्रापूर मार्गे शालेय विद्यार्थ्यांसह, शेतकरी व नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सदरची बससेवा चालू झाली तर प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे .
सदरची बससेवा पूर्ववत करण्यासाठी वडनेर ग्रामपंचायतीच्या वतीने साईक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक नवनाथ निचित, उपसरपंच विक्रम निचित यांनी शिरूर येथील आगारप्रमुख शिर्के यांना निवेदन देऊन संबंधित बस सेवा पूर्ववत करण्यासंदर्भात सूचना केली असून गणेशोत्सवानंतर सदरची बससेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन शिर्के यांनी दिले असल्याचे नवनाथ निचित यांनी सांगितले.