बीड (प्रतिनिधी) आई - वडील एड्सबाधित असलेल्या विद्यार्थी मुलास, आजार नसताना संस्थाचालक आणि सरपंच आजार असल्याचे कारण पुढे करत, पाच वर्षीय विद्यार्थाला शाळेत बसू देत नाहीत. अशा आरोपाची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. हा प्रकार बीडच्या पाली गावात उघडकिस आला असून यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

बीड शहरालगत असलेल्या पाली येथील परिवर्तन इंग्लीश स्कुलमध्ये, हा प्रकार घडल्याचे विद्यार्थ्याच्या आईने निवेदनात म्हटले आहे. या दिलेल्या निवेदनावरून, 19 जुलै 2022 रोजी पाच वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर मुलाला दुर्धर आजार असल्याचे कारण सांगून, दुसऱ्याच दिवशी शाळेतून घरी पाठविण्यात आले. त्याचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतरही आम्हाला त्रास होतो, मुलाला शाळेत पाठवू नका, असे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनीही मुलास शाळेत पाठवू नका, असा निरोप देण्यात आला होता. जेव्हा हा विद्यार्थी शाळेत गेला त्यावेळी त्याला कोपऱ्यात बसविणे , जेवायला बाजूला बसविणे , मुलांचे खेळ व गप्पांमध्ये सहभागी न करुन घेणे. असा आरोपही करण्यात आलाय. मुलाला शाळेत पठवून वातावरण बिघडवू नका , शिवाय तसा मॅसेजही केल्याचे मुलाच्या आईने सांगीतले आहे. त्यामुळं मुलाचा शिक्षणाचा हक्क डावलू नये. अशी मागणी यावेळी विद्यार्थी मुलाच्या आईने निवेदनात केली आहे.