मागील दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या काळात गेली. कोरोना संसर्ग संपूर्णपणे आजही गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी आनंदात साजरा करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रत्येकाने पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.आज 23 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2022 ची पुर्व तयारीच्या दृष्टीने समन्वय व शांतता समितीची सभा श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.षण्मुगराजन म्हणाले, गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या ठिकाणी आणि ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक निघणार आहे, अशा रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यात यावे व परिसर स्वच्छ करण्यात यावा. वीज पुरवठा या काळात खंडीत होणार नाही याबाबतची दक्षता महावितरणने घ्यावी. गणेशोत्‍सवादरम्यान आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गणेशोत्सव मिरवणूकीचा मार्ग सुध्दा निश्चत करावा. विद्यूत तारांपासून मिरवणूकीला कोणताही धोका राहणार नाही याबाबतची जबाबदारी वीज वितरण कंपनीने पार पाडावी असे ते म्हणाले.गणेश विसर्जनाचे ठिकाण एकच असावे. असे सांगून  षण्मुगराजन म्हणाले, विसर्जनाच्या ठिकाणी पोहणारे व्यक्ती उपस्थित ठेवावे. मिरवणूकीच्यादरम्यान आवश्यक त्या संवेदनशिल ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात यावे. तहसिलदारांनी तालुका पातळीवर समन्वय समितीची बैठक घ्यावी. गणेशोत्सव मंडळाला एक खिडकीतून आवश्यक त्या परवानगी देण्याची कार्यवाही वेळीच पुर्ण करावी. घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रीम तलाव तयार करण्यात यावेत. वार्डनिहाय नोडल अधिकारी देखील नियुक्त करावे. गणेश मुर्ती बसेल त्याठिकाणी आणि मिरवणूकीच्या मार्गातील रस्त्यांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबतची दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगीतले. श्री. सिंह म्हणाले, या सभेत उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्दयांची निश्चितपणे दखल घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच वाद्यांचा आवाज असला पाहिजे. पारंपारीक वाद्ये वापरण्यास मनाई नाही पण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी. मागील काही वर्षात गणेशोत्सवादरम्यान जिल्हयात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडलेल्या नाही. यावर्षीसुध्दा गणेशोत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. गणेशोत्सव काळात समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगीतले. भामरे म्हणाले, राज्य सरकारकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सूचनांचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे सुध्दा आपण सर्वांनी पालन करावे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती यावेळी दिली. शांतता व समन्वय समितीचे सदस्य असलेले श्री. नितीन उलेमाले म्हणाले, गुलाल विरहीत मिरवणूक निघाली पाहिजे. गुलालामुळे डोळयांना व शरीराला इजा होते. गुलाल ऐवजी फुलांची उधळण मिरवणूकीवर झाली पाहिजे. गणेश विसर्जन समिती सुध्दा तयार करण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाच्या मंचावरुन कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.अन्सार मौलाना म्हणाले, काही सण झाले आहे. काही सण आगामी काळात येणार आहे. संपूर्ण वाशिम जिल्हा शांत राहून सर्वांनी हे सण उत्साह, शांती आणि प्रेमाने साजरे करावे. सर्व सण व उत्‍सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता त्याबाबतची खातरजमा करावी. आपण सर्वजण भारतीय आहोत ही बाब लक्षात घ्यावी.   शिरपूर (जैन) येथील अस्लम पठाण यावेळी म्हणाले, कोविडमुळे मागील दोन वर्षात कोणतेही सण, उत्सव साजरे करता आले नाही. या वर्षीच्या सण उत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन हे सण उत्सव आनंदाने साजरे करावे. गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांनी विविध समाज प्रबोधनाचे उपक्रम हाती घ्यावे. असे त्यांनी यावेळी सुचविले. यावेळी रिसोड येथील बाळासाहेब खरात, मंगरुळपीर येथील विनोद डेरे, कारंजा येथील संजय कडोळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सभेला वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका/नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ, जिल्हयातील सर्व 12 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशननिहाय असलेल्या शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, निवडक प्रतिष्ठीत नागरीक यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांनी तर आभार कारंजाचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी मानले.