जामखेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जामखेड तालुक्यात झालेल्या CTC,पशु सखी,कृषी सखी यांच्या नेमणुका करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत.नेमणुका रद्द व्हाव्यात या संदर्भात संबधित अधिकारी यांना वारंवार कळवून सुद्धा कसलीही दखल घेतली गेली नाही. यामुळे येत्या दोन तीन दिवसात सदर प्रक्रिया रद्द न झाल्यास उद्या दि. २४ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे तालुका व्यवस्थापक तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ दालनात उपोषण्याचा ईशारा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान सदाशिव मुरुमकर, भा.ज.पा. जिल्हा उप अध्यक्ष रवींद्र सुरवसे व माजी जिल्हा परिषद सदस्य सोमानाथ पाचरणे यांनी दिला आहे. 

याबाबत त्यांनी १७ ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनावर डॉ. भगवान मुरूमकर,रविंद्र सुरवसे व सोमनाथ पाचरणे यांच्या सह्य़ा आहेत. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार हे निवेदन दिले असून यावेळी आंदोलन कर्ते यांचेसह भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, धामणगावचे सरपंच महारूद्र महारनवर, बब्रुवान वाळुंजकर, जेष्ठ नेते बापू शिंदे, युवक कार्यकर्ते उदय पवार, भरत जगदाळे डॉ. गणेश जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

या निवेदनाच्या प्रति अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनाही देण्यात आल्या आहेत. यावर गटविकास अधिकारी यांनी सदर प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे म्हटले आहे. मात्र आंदोलन कर्त्यांना ही बाब मान्य नसल्याने ते आंदोलनावर ठाम आहेत