सोलापूर :- अहिरवाडी येथे शेतीच्या वादातून गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी चौघा भावंडांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पाढरे यांनी जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला आहे. बप्पू ऊर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे, सिद्धाराम महादेव दिंडोरे, शिवानंद महादेव दिंडोरे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

मल्लीकार्जुन धोंडप्पा दिंडोरे (रा. अहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. मधुकर धोंडप्पा दिंडोरे यांनी फिर्याद दिली होती.

मधुकर दिंडोरे व मयत मल्लिकार्जुन दिंडोरे, त्यांची बहीण भागीरथी यांच्या शेतजमिनीचा असलेला वाद सामोपचाराने मिटला होता. हा जमिनीचा वाद परस्पर का मिटविला म्हणून शरणप्पा दिंडोरे, बसवराज दिंडोरे, सिद्धाराम दिंडोरे, शिवानंद दिंडोरे यांनी वस्तीवर येऊन मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घालत भांडण काढले. या भांडणात शरणप्पा दिंडोरे याने आपल्या जवळील बंदुकीतून मल्लिकार्जुन यांच्यावर गोळ्या झाडल्या. डोक्यात, गळ्यावर गोळ्या लागल्याने त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात 14 साक्षीदार तपासण्यात आले. यातील सहा साक्षीदार फुटले.

सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला. मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखप्रमाणे आठ लाख रुपये देण्याचे आदेशही दिले. यात सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीपसिंग रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. देशमुख, ऍड. फतारटे, ऍड. लोंढे पाटील, ऍड. रिसबूड यांनी काम पाहिले.